Thursday 1 April 2021

एका लग्नाची गोष्ट

 

      लग्नाचा किस्सा आठवला की आजही हसू येते. ४५/४६ वर्षांपुर्वीची गोष्ट. त्या काळात २१/२२ वर्षांचा असतानाच लग्न व्हायचे. मी बावीसचा असताना वडील लग्नासाठी घाई करू लागले. मी मुंबईची सीआयडीची नोकरी सोडून खेड्यावर परत आलो होतो. जोवर चांगली नोकरी लागत नाही तोवर लग्न करायचे नाही या विचाराने मी नकार देऊ लागलो. वडिलांना स्पष्ट सांगितले की बहिणीचे लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. १९७० मध्ये बहिणीचे लग्न झाले. तिच्या पाठी आणखी दोन बहिणी होत्या. चुलता-चुलती वारल्यामुळे चुलत भावंडं आमच्यातच होती.    दरम्यानच्या काळात मी छोट्या मोठ्या बऱ्याच नोकऱ्या केल्या. विमा एजन्सी घेऊन गावोगाव भटकू लागलो. गो-ह्याने पाडल्यामुळे पाय फ्रॅक्चर होऊन वडील घरीच होते. त्या काळात दोन्ही बहिणींची लग्ने मीच पुढाकार घेऊन जुळवली. १९७४ मध्ये दोघींचेही विवाह झाले. आणि वडिलांनी आमच्यासाठी मुली पाहणे सुरू केले. मी आणि माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या चुलतभावासाठी त्यांचे वधूसंशोधन सुरू झाले.

  मार्च महिन्यात एके दिवशी त्यांनी जाहीर केले. ' अमरावतीला दोन मुली पसंत करून ठेवल्या आहेत. दोघेही जावयांना सोबत घेऊन मुली पाहून या.' वडिलांसमोर काही बोलायची आमची प्राज्ञा नसायची. त्यांनीच एक दिवस निश्चित केला. अमरावतीला निरोप पाठवला गेला. आम्ही दोघेही अमरावतीला बहिणीकडे गेलो.

    दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होऊन आम्ही मेहुण्यासोबत पहिली मुलगी बघायला गेलो. मुलीचे भाऊ कॉलेज मध्ये प्रोफेसर होते. त्यांनी आमची विचारपूस केली. मुलगी आली. मी आधीच भिडस्त. वर मान करून पाहण्याचे धाडस झाले नाही. पाहण्याचे सोपस्कार पार पडल्यावर आम्ही तेथून दुसरी मुलगी बघायला निघालो.

     रिक्षात बसल्यावर मेहुण्यांनी मला विचारले, " काय बाबा? कशी वाटली मुलगी?" मी काही बोलायच्या आतच भास्कर म्हणाला," मला वहिनी म्हणून पसंत आहे."
         माझ्या आवडीनिवडीचा प्रश्नच उरला नाही. मोठेपणाचा आव आणून गप्प बसलो.
अर्थात दुसरी मुलगी पाहून झाल्यावर मेहुण्यांनी भास्करलाच विचारले. त्यानेही पसंती दर्शविली.
अशा रीतीने लग्न जुळले. मला नोकरी नव्हतीच. विमा एजंट म्हणून काम करत होतो. त्या काळात २७/२८ वय म्हणजे घोडनवराच होतो. आणि नवरी १७/१८ ची. दहा वर्षांचे अंतर आहे आमच्यात...

    १२ एप्रिलला साक्षगंध आणि ३० मे १९७५ रोजी लग्न झाले. सात दिवसांनी भास्कर चे लग्न होते. आठ दिवस आशा घरात होती. पण कधी नजरानजर होत नव्हती. माझा भिडस्तपणा आणि पाहुण्यांनी गच्च भरलेले घर. मित्राची बायको मुंबईहून मुलीला घेऊन लग्नाला आलेली..दहा दिवस आमच्या खेड्यातच होती. तिने आम्हा दोघांमध्ये बोलण्याचे अनेक प्रसंग घडवून आणले. पण कोणी पाहिले तर काय म्हणतील या भीतीपोटी मी तेथून सटकायचो..

       लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पृथ्वीवर फक्त सोहळे साजरे होतात
असं म्हटलं जातं. ते अक्षरशः खरे वाटते. आज लग्न होऊन ४६ वर्षे होत आहेत. या संसारात तिचा सिंहांचा वाटा आहे. मुलांचे संगोपन, आई-वडिलांचे आजारपण, लग्नसमारंभातील आहेर,भेटी....मला या कोणत्याच गोष्टीत लक्ष घालायची कधी गरज पडली नाही. कठीण प्रसंगात ती पाठीशी उभी राहिली.

     आशाला आई-वडील, बहीण-भाऊ कोणीच नव्हते. ती तीन वर्षांची असल्यापासून तिच्या मावसभावाने तिचा सांभाळ केला. आईने म्हटले होते की मला हीच मुलगी सून म्हणून हवी आहे. तिला मी आईचे प्रेम देईन. आईने शब्द खरा केला. या दोघीत मायलेकीचे नाते निर्माण झाले होते. हाच वारसा आशाने पुढे चालवला. आमच्या तीनही सुना आमच्या मुलीच आहेत. आम्हाला मुलगी नसल्याची खंत सुनांनी भरून काढली.
      कुबेरच्या मुलींसाठी आमचे घर जणू माहेरच आहे.
मुले त्यांच्या कुटुंबात रममाण झाली आहेत. घरी आम्ही दोघेच असतो. पण आमचे एकमेकांशिवाय पानही हलत नाही.
याच आमच्या साताजन्माच्या गाठी आहेत याबद्दल दुमत नाही....

                         * सुरेश इंगोले *

Friday 25 December 2020

एका दगडाची गोष्ट

            * एका दगडाची गोष्ट *


परवा अचानक एक कार घरासमोर उभी राहिली. त्यातून एक कुटुंब बाहेर पडले. नवरा, बायको आणि दोन मुले..साधारण चौदा ते सोळा वयाचे.  फाटक उघडून ते आत येऊ लागले. पण ते कोण आहेत हे माझ्या काही लक्षात येत नव्हते. त्या माणसाचा चेहरा कधीतरी पाहिल्यासारखे वाटत होते.


" नमस्कार सर. ओळखलंत मला.?" त्याने हसून विचारले.

 मी नकारार्थी मान हलवली. 

" या, आत या. बसा.." 

मी त्यांना घरात घेऊन आलो. 

मी खुर्चीत बसताच त्याने मला वाकून नमस्कार केला. पाठोपाठ बायको व मुलांनी सुद्धा पायावर डोके ठेवून नमस्कार केला. मला अवघडल्यासारखे झाले. 

"अरे, काय हे! " असे काहीसे पुटपुटताच तो म्हणाला, " सर, तुम्ही आमचे भाग्यविधाता आहात. हा तुमचा मान आहे."

" मी खरंच तुम्हाला ओळखलं नाही." मी दिलगिरी व्यक्त केली.

" सर, मी विनोद...विनोद लांजेवार !  तुम्ही रिटायर व्हायच्या दोन वर्षे आधी शिक्षक म्हणून लागलो होतो. आपला सहवास तसा कमीच लाभला."

" अरे हो, आठवले. मला वाटतं, मी रिटायर झाल्यावर तुम्ही सुद्धा नोकरी सोडून गेल्याचे कळले होते."

" हो सर! गावाशेजारच्या शाळेत एक जागा निघाली होती. आपल्या शाळेतून अतिरिक्त झाल्यावर तेथे सामावून घेतले गेले.एकदा तुम्ही माझी मायेने चौकशी केली होती. कां कोण जाणे, पण मी तुमच्याजवळ मनमोकळेपणाने व्यक्त झालो होतो."


मला काही आठवत नव्हते. माझ्या चेहऱ्यावर तसे भाव दिसताच तो पटकन म्हणाला, " आठवतं सर ? तुम्ही मला एक दगड दिला होता. त्याला देवघरात ठेवायला सांगितले होते. रोज त्याची पूजा करायला सांगितली होती. "


एकाएकी माझ्या डोक्यात प्रकाश पडला. माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले. 

* * * *


   नदीकाठी किंवा समुद्रावर फिरायला गेल्यावर तिथले वाळूतले रंगीबेरंगी दगड व शंख-शिंपले गोळा करायचा मला छंद होता.  घरातल्या शोकेसमध्ये, नकली फुलांच्या पितळी कुंड्यांमध्ये ते दगड, शंख, शिंपले मी रचून ठेवले होते. हिरवे, करडे, काळे, पांढरे असे ते दगड छान दिसायचे. 

     एकदा विनोद शाळेतून माझ्या घरी आला. तो चिंतेत वाटत होता. मी आत्मीयतेने विचारले तसे तो स्वतः:विषयी, बायको व आई-वडिलांविषयी सांगू लागला. घरची परिस्थिती अगदीच वाईट नव्हती. शेतीचे उत्पन्न बऱ्यापैकी येत होते. त्यालाही शिक्षणसेवक म्हणून नियमित, कमी कां होईना, पगार मिळत होता. पण इतरांशी तुलना करताना त्याच्या मनावर निराशेचे सावट दिसत होते. त्याची बायको सतत आजारी असायची. डॉक्टरांनी तिला कोणताच आजार नाही हे निक्षून सांगितले होते. त्याला सकारात्मक ऊर्जेची गरज होती.

"आपल्याजवळ जे नाही त्याचा विचार करून चिंता करीत बसण्यापेक्षा जे आहे  ते ज्याच्याजवळ नाही त्याच्याशी तुलना करून पहा. समाधान मिळेल. " हे सांगत मी त्याला अनेक उदाहरणे दिली. त्याला ते पटल्यासारखे वाटले. त्याच्यासारख्या पापभीरू व देवभोळ्या माणसावर एक प्रयोग करावा असे वाटून मी कुंडीतला एक हिरवा दगड घेतला. त्याला धुवून साफ करून विनोदला देत सांगितले," हा दगड देवघरात ठेव. मनोभावे त्याची पूजा कर. मनात कधीही निराशेचे विचार येणार नाहीत. सगळं चांगलं होईल. मात्र याबद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाही. नाहीतर   त्याचा प्रभाव नष्ट होईल."

  मी त्याला हे काय आणि कां सांगितले हे मलाच क्षणभर कळले नाही. गंमत म्हणून एक प्रयोग केला होता आणि तो अंगलट येऊ नये म्हणून खबरदारी घेतली होती एवढे मात्र खरे..!

* * * *


" सर, खरंच तुमचे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. तुम्ही दिलेल्या दगडाची आम्ही रोज पूजा करतो. काही दिवसातच आम्हाला त्याची प्रचिती येऊ लागली. विद्याला बरं वाटू लागलं. ती हुरूपाने कामं करू लागली. मी पूर्ण वेळ शिक्षक बनलो. पगार भरपूर वाढला. शेतीला मी पैसा पुरवू लागलो. बोअरवेलमुळे शेतीला बरकत आली. काय आणि किती सांगू सर...!

या दहा बारा वर्षात ज्या काही विपत्ती आल्या होत्या त्यावर आम्ही सहज मात करू शकलो. मागच्या वर्षी आम्ही चौघे मॉरिशसची सहल करून आलो. आज नागपूरला जात असताना आपली प्रकर्षाने आठवण झाली. "

   त्या चौघांशी गप्पा मारत असताना जाणवले की यांना सत्य सांगण्यात काही हशील नाही. कधी कधी अज्ञानातही सुख असते. त्यांच्या बाबतीत जे काही घडत गेले ते त्यांच्या मनाच्या सकारात्मकतेमुळे. आयुष्यात एकदा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला की जगणं सोपं होतं. 


चिंता, संकटं, अडचणी, व्याधी हे सगळे प्रत्येकाच्याच नशीबात आहेत. पण माझं कसं होईल या विचाराने हातपाय गाळून बसण्यापेक्षा यातूनही काही चांगलंच होईल हा दृष्टिकोन ठेवला तर जगण्याला, लढण्याला बळ मिळतं..


निरोप घेताना विनोद हळूच म्हणाला," सर, एक विनंती आहे. विद्याचा भाऊ..माझा शालक..अशाच गंभीर परिस्थितीत आहे. त्याच्यासाठी एक दगड मिळेल का? आम्ही त्यालाच काय, कोणालाच याबाबत काही सांगितले नाही. विद्यानेच सुचवले म्हणून..."


त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मी म्हणालो," असा कोणताही दगड आता माझ्याकडे नाही. असे समजा की तो एकमेव होता जो तुमच्या स्वाधीन केला होता. तुमचे सगळे चांगले होत आहे तेव्हा आता तोच दगड त्याला द्या. बघा, तुम्हीच विचार करा.."


* * * 

सारांश हाच....की निराशेत असणाऱ्या प्रत्येकाने असा कोणताही एक दगड मनोभावे देवघरात ठेवून त्याची पूजा केली तर निश्चितच फरक पडेल.

करून पहायला काय हरकत आहे....?


       © सुरेश इंगोले.


Monday 14 December 2020

चकवा

 

चकवा

‌    सिताराम बुढ्यानं म्हशीले गोठ्यात बांधून तिच्याम्होरं चारा टाकला. पाठीवरून हात फिरौला. गळ्याले खाजवू लागला तशी म्हशीनं मान फिरवून त्याच्या हाताले चाटनं सुरू केलं.

" खाय माय पोटभर....तुहं पोट भरंन तं आमचं पोट भरंन. तुह्यावरंच आता हे घर चालते माय.." बुढ्यानं असं म्हंताच म्हशीनं रेकून त्याले जवाब देल्ला. मुक्या ढोराहिले मानसाचं मन बरोबर वाचता येते.

सिताराम बुढ्यानं वसरीत यिवून पागोटं काहाडलं आन् मंदाले आवाज देल्ला. तशी मंदा पान्याचं भांडं घिवून आली.

पानी पेता पेता बुढ्यानं चवकशी केली.

" का म्हंते जवाई ?  काई निरोप आल्ता का? कवा येते घ्या ले? "

" नाव नोका घिवू त्या लोभी मान्साचं..." मंदा फनकाऱ्यानं घरात निंगून गेली.

बुढा डोक्शाले हात लावून बसला.
***
   तिगस्ता मंदाले पाहाले काचनूरचे पाव्हने आलते. पोरगा साजरा व्हता उच्चीपुरा. बारावी शिकला व्हता. आंगानं धडधाकट. घरी चार एकर वावर होतं. त्याच्या बहिनीचं लगन झालतं...पोराचे मायबाप गरीब वाटले व्हते पन त्याचा मावसा मात्र जहाल होता.

पोरापोरीची पसंती झाल्यावर हुंड्यासाठी त्या मावशानं लय घाईस आनलं. पोराचा बाप महिपती पाटील याले तं तोंड उघडू न्हाई देल्लं..मावसा तुयशीराम राहून राहून पोराच्या.. शिरपतीच्या कानात पुटपुटे. आन् हुंड्याचा आकडा वाढवत ने.

सिताराम बुढा माळकरी मानूस पन वेव्हारात
पक्का. त्यानं रोखठोक सांगितलं..
"हे पाहा, तुयशीरामबुवा...जेवढी आयपत हाये थे सारं कबूल केलं. अंगठी, गोफ, कपडेलत्ते सारं रीतीरिवाजानं ठरलं. आता फटफटी काई आपल्या बजेटात न्हाई. हां, पोरीच्या नावानं एक एकर शेत हाये ते तिले देऊन टाकतो. पाहा ज्यमत असंन तं.."

तुयशीराम शिरपतीच्या कानी लागला. थोडीशी खुसुरफुसुर झाली. मंग मावसाजी बोलले," ठीक हाये. एक एकर पोराच्या नावानं करून द्या. उडवून टाकू बार!"

" आता पोरगीच पोराले देऊन राह्यलो ना. तिच्या नावाचं शेत शिरपतरावालेच हुईन का न्हाई..."

   सिताराम बुढ्यानं मंदा आन् शिरपतचं धूमधडाक्यात लगंन लावून देल्लं. सिताराम बुढ्याचं पोरगं शहरात शिकाले होतं. लगनात खूप राबला संज्या. मंदा काचनूरले गेली, संज्या वर्धेले गेला आन् बुढा बुढी दोगंच बेढोन्यात शेतीत राबू लागले. घरी दोन गायी आन् यक म्हैस व्हती. बुढाबुढीनं म्हशीचं नाव दुर्गा ठिवलं व्हतं...

माहेरपनाले आलेली मंदा काही बोलेच नाही तं बुढाबुढी इचारात पडले. रखमा बुढीनं तिले खोदूखोदू इचारलं तवा तिनं सांगितलं का तिचा नवरा भल्ला लोभी माणूस हाये. त्याले उडवाले फक्त पैसे पायजे. महिपती पाटलाशी त्याचे नेहमी खटके उडत राह्यते. घरच्या वावरात तं पाय ठेवत न्हाई शिरपती. मले म्हंते, तुह्या नावाचं वावर माह्या नावावर करून दे. थे विकून मले फटफटी घ्या ची हाये.. त्याहिच्या सोभावाले घरचेच कटायले हायेत.

***

दोन वरसं झाले. मंदाले पोरगा झाला. तिच्या बायतपनात एक गाय ईका लागली. घरची परिस्थिती पाहून संज्यानं वर्धेत एक काम धरलं. आपल्या शिक्षनाचा खर्च त्यानं बुढ्यावर यिऊ न्हाई देल्ला. एकडाव दोस्तासंगं संजू गावाले आलता. वापस जातांना मंदाले भेटून जावं म्हनून थो काचनूरले गेला. भावाले पाहून मंदा लय हरकली. तिच्या सासऱ्यानं मुक्कामाचा आग्रह केला. पन दोघालेही अंधार पडाच्या आत वर्धेले पोहचाचं होतं.  तिसऱ्याच दोस्ताची फटफटी आनली होती ते वापस कराची होती. चहापानी घेऊन निंगनार तेवढ्यात शिरपती घरी आला. दारात फटफटी पाहून तो चकरावला. संज्याशी काई जास्त बोलला नाही. रामराम घेऊन संज्यानं फटफटी सुरू केली तवा शिरपतीच्या डोयात आग दिसत होती. दुसऱ्याच दिवशी त्यानं मंदाले आन् मनोजले बेढोन्याले आनून घातलं. फटफटी भेटंन तं काचनूरले घिवून जाईन न्हाई तं राहा इथंच असं म्हनून तो चाल्ला गेला.

***
घरातून मनोजले आनून मंदानं बुढ्याजवय देल्लं. बुढ्यानं त्याले कडीवर घेतलं आन् तो गनेशाच्या दुकानाकडं निंगाला. आता गोया, चाक्लेट खा ले भेटंन म्हनून नातू खुश झाला.

अंधार पडाले आला तसा घरी जा साठी सिताराम बुढा नातवाले घेऊन उठला. तं मंदा बोंब ठोकतच दुकानाकडं आली.
" आन्याजी, मनोजचे बाबा आपली म्हैस घेऊन गेले. कोनाचंच आयकलं न्हाई वो. मी आडवी झाली तं मलेई ढकलून देल्लं." ढोपराचं रगत पुसत रडत रडत मंदा बोलली.
बुढा सन्नं झाला. त्याचे हातपाय गयाठले. तो मटकन खालीच बसला.
या महामारीनं साऱ्याहिले घरात बसौलं होतं. कामधंदे बंद होते. खा प्या चे वांधे होते. सहा महिन्यानं कारखाना पुन्हा सुरू झाला म्हनून संज्या वर्धेले गेला होता. घरी बसून तो ही कटायला होता. आता या जवायाच्या मांगं कोनाले धाडाव..म्हशीले घेऊन कुठं गेला अशीन जवाई काय म्हाईत...?

पोरीले आन् नातवाले घेऊन बुढा घरी आला. वसरीत डोक्याले हात लावून बसला. बुढी डोयाले पदर लावून बसली व्हती. गावातले लोक डोकावून जात होते.

मानकराचा हनमंता सायकलवर आला. सायकल भिंतीले लावत बोलला," आन्याजी, म्या जवायाले लय रोखन्याची कोशिस केली.  मनलं, बेढोन्याच्या जंगलात चकवा हाये. फालतू जीव जाईन.  चाला वापस. पन तुमच्या दुर्गीनं त्याहिले ओढत जंगलात नेलं."
हे आईकल्याबरूबर बुढीनं आन् मंदानं गयाच काहाडला. दोगी बी बोंबलाले लागल्या तसा बुढा त्याहिच्यावर खेकसला.

पोलिसपाटलानं पाठवलेले दोन तगडे गडी अर्ध्या राती हात हालवत वापस आले. मंदाच्या डोयाले धाराच लागल्या. सारेच जागे होते. साथ कराले आलेले शेजारी इथं तिथं कलंडले.

पहाट झाली. सारे आडवेतिडवे पसरले होते. मंदाले जाग आली.  तिनं दूरवर पाह्यलं आन् मोठ्यानं ओरडली....
" आन्याजी, आपली दुर्गी आली. "
तसे सारे पटापट उठले.  साऱ्याहिनं तिकडं पाह्यलं..दुर्गी हंबरत रेकत घराकडे धावत येत होती. तिच्या मांगं मांगं शिरपती हेलपाटत येताना दिसला. साऱ्याहिच्या जिवात जीव आला.
दुर्गी धावतच गोठ्यात शिरली. रेडकाजवय जाऊन चाटाले लागली. रातपासूनचा पान्हा दाटला होता. रेडकू ढुसन्या देत दूध पिऊ लागला.

दोगातिगाहिनं जवायाले हात धरून खाटेवर बसंवलं..मंदानं पानी आनून देल्लं तसं शिरपतीनं झटका मारून पान्याचा गिलास फेकला. तसा भिवा जवायापाशी येऊन बसत बोलला, " बाई, पानी नोको दाखवू काही येळ...रातभर चकव्यानं त्याहिले पानीच दाखौलं असंन..जवाई, काय काय झालं समदं सांगा बरं..."
भिवा शिरपतीच्या पाठीवर हात फिरवत धीर देत ईचारू लागला. शिरपती आता सावरला होता. त्यानं हळूहळू सांगाले सुरवात केली.

आर्वी तालुक्यात बेढोन्याचं जंगल चांगलंच दाट हाये. पन्नास साठ वरसाआंधी वाघाची शिकार कराले शिकारी या जंगलात फिरे. आता वाघ हाये का नाही  माहित नाही  पन जंगल अजूनई दाटच हाये.
     दुर्गीनं शिरपतीच्या हाताले झटका मारून गावचा रस्ता धरला  तसा  शिरपतीनं दोर धरून जवयची काठी उचलली  आन् तिले काचनूरच्या दिशेनं ओढत निऊ लागला. जंगलात घुसल्यावर अंधार आनखीनच गडद झाला. नुसतं चालनं चालनं ..पाय थकले पन रस्ता काई दिसे न्हाई. शिरपतीचा घसा कोड्डा पडला. थो पानी पानी कराले लागला. दुर्गीचा दोर हातात असूनही कोनीच कोनाले ओढत नोहतं. अचानक मांगं आवाज आला. पाह्यलं तं एक मानूस त्या बाजूले हात दाखवत पानी हाये म्हनून सांगत होता. घसा सुकलेला शिरपती त्याच्या मांगं निंगाला. थोड्या दूरवर पान्याचा तलाव दिसला. शिरपतीनं दुर्गीचा दोर आपल्या हाताले बांधला अन् तो पानी प्या ले तलावाच्या काठावर झुकला. जसं त्यानं वाकून तलावातल्या पान्याले हात लावला तशी त्याच्या पाठीवर जोरदार लाथ बसली. तोल जाऊन शिरपती पान्यात पडला. नाकातोंडात पानी जाऊन तो आदमुसा झाला तेवढ्यात दुर्गीनं मानेले जोर लावून शिरपतीले पान्याभायेर ओढलं. हाताले दोर बांधला असल्यानं शिरपती आपसूकच भायेर आला. थो चांगलाच घायबरला होता.
जरासाक सावरल्यावर त्यानं आजूबाजूले पाह्यलं. पन तिथं कोनीच नोव्हतं..शिरपतीनं दुर्गीच्या गयाले मिठी मारली आन् ढसढसा रडाले लागला.

गयाठून गेलेला शिरपती दुर्गीच्या आसऱ्यानं सही सलामत घरी पोहोचला होता. रखमा बुढीनं चूल पेटवली.  समद्याहिसाठी चहा ठिवला.  मीठ-मोहरी-मिर्च्यानं शिरपतीची दीठ काहाडली. मंदा शिरपतीले घरात घिवून गेली. तिचा हात धरुन शिरपती बराच येळ रडत व्हता.

एकाएकी तो उठला. गोठ्यात जाऊन दुर्गीले कवटायून रडला. दुर्गी त्याच्या हाताले चाटू लागली. वसरीत यिवून तो बुढाबुढीच्या पाया पडला आन् दोन्ही हात जोडून बोलला,
" आन्याजी, माय...आजवर लय वाईट वागलो मी. पोरगा समजून माफ करा. आता मी घरच्या वावरात काम करीन. मंदाले अन् मनोजले काई कमी पडू देणार न्हाई..." पुढं त्याले बोलनं जमलं न्हाई. तो ढसढसा रडाले लागला.

बुढ्यानं त्याले उठवून जवय बसवलं आन् पाठ थोपटत बोलला," आमचा सोन्यासारखा जवाई आमाले वापस भेटला. समदं पावलं...मंदे, आज पुरन टाक बाई...साजरं गोडाधोडाचं बनवा..."

        ***        ***         ***

                © सुरेश इंगोले

Friday 9 October 2020

     # होस्टेल लाईफ. # (२)



    १९६२-६३ मध्ये माझे मोठे काका- काकू सहा महिन्याच्या अंतराने वारले. आमची तीन चुलत भावंडं आमच्या घरी आली. खाणारी तोंडं वाढली. वडिलांचा पगार पुरेना. 


     मी होस्टेलमध्ये राहत असताना वडिल दरमहा ऐंशी रुपये पाठवायचे. पंचेचाळीस रुपये मेसला लागत. वीस रुपये कॉलेजची फी होती. पंधरा रुपये खूप काटकसरीने वापरावे लागायचे. मी अवांतर कोणतेच खर्च करणे टाळायचो…


     हिरामन उईके आमच्या शेजारच्या रुममध्ये राहायचा. खेड्यातून आलेला हिरामन खूप साधा, सालस व स्वभावाने गरीब होता. तोही खूप काटकसरीने वागायचा. कधी त्याचे वडील भेटायला यायचे तेव्हा पपया, संत्री घेऊन यायचे. तो आम्हाला खायला बोलवायचा. आम्ही त्याला बागायतदाराचा मुलगा समजून त्याच्याशी अदबीने वागायचो. 


      एकदा असेच फळे खात असताना मी त्याला विचारले, " तुझ्या बागेत संत्रा पपयांची किती झाडे आहेत रे?"


   तो बराच वेळ गप्प बसला. मग शांतपणे म्हणाला," आमच्याकडे शेती नाही. माझे वडील पोतदाराच्या बागेत सालकरी आहेत. ते भेटायला येताना वानवळा आणतात."


   हिरामनच्या घरची परिस्थिती लक्षात येऊ लागली होती. आपल्या गरीबीचा फाटका पदर तो कोणालाच दिसू देत नव्हता. आणि स्वाभिमानाने जगत होता...जगणे शिकवत होता.


माझे नि हिरामनचे ट्युनिंग छान जुळले होते. 

आर्वीहून आमचे फराळाचे डबे आले की मी हिरामनला फराळ नेऊन द्यायचो. मला आवडतं म्हणून अंबाडीची भाकरी व मिरचीचा ठेचा तो माझ्यासाठी मुद्दाम राखून ठेवायचा. 


     परीक्षेचे दिवस जवळ आले. फी भरायची तारीख जाहीर झाली. हिरामन जरा अस्वस्थ दिसू लागला. दोन दिवसांनी त्याची तगमग पाहून मीच विचारलं, " काय रे! पैशाची अडचण आहे का? जरा अस्वस्थ दिसतोस म्हणून विचारलं…"

" हो! घरून पैसे आले नाहीत. शेवटची तारीख जवळ येत आहे.."

" अरे, काळजी करू नकोस. आम्ही गोळा करतो. सोय झाल्यावर परत करता येईल."

" नाही…" तो ठामपणे म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचा करारीपणा पाहून मी पुढे बोलू शकलो नाही.


    आम्ही बराच वेळ चिंतित होऊन वेगवेगळ्या पर्यायावर चर्चा करीत राहिलो. बोलता बोलता हातातल्या घड्याळाशी खेळत तो म्हणाला," हे घड्याळ विकायला गेलो होतो काल... चाळीस रुपये सुद्धा द्यायला कोणी तयार झाला नाही."


    मी त्या घड्याळाकडे एकटक बघत राहिलो. एच एम टी चे घड्याळ होते. देखणे डायल होते. मी बराच वेळ विचार करीत होतो.‌ अचानक कुठल्यातरी पुस्तकात वाचलेला एक किस्सा आठवला. माझे डोळे चमकले. मी हिरामनला घड्याळ मागितले. त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणालो, " तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळतील."


     दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळी नऊच्या सुमारास नाश्त्याच्या वेळी मेससमोर सगळे गोळा झाले होते. मी कारंजाजवळ उभा राहून ती घड्याळ हात उंचावून दाखवत जोरात बोललो, " फक्त एक रुपयात घड्याळ….कोणाला हवी आहे?"

सगळे चमकले. 

" क्या बक रहा बे….!" कोणीतरी रागाने विचारले.

" ज्याला घड्याळ घ्यायची आहे त्याने स्वत:च्या नावाची चिठ्ठी व एक रुपया या डब्यात टाकावा. साडेदहा वाजता त्यातून एक चिठ्ठी बाहेर काढली जाईल. ज्याचे नाव असेल त्याला ती घड्याळ मिळेल."

थोड्याच वेळात ही बातमी होस्टेलभर पसरली. नशिबाने मिळाली तर एक रुपयात घड्याळ अन्यथा एक रुपयाचे नुकसान म्हणजे नगण्यच!

हळूहळू डबा चिठ्ठी व नाणे-नोटांनी भरू लागला. गोष्ट वॉर्डनच्या कानावर गेली. ते स्वत: बघायला आले. 

" मिस्टर इंगोले, हे बेकायदेशीर आहे असे तुम्हाला वाटत नाही?" त्यांनी मला विचारले. मी याचा विचारच केला नव्हता. मी त्यांना हिरामनची अडचण, त्याचा स्वाभिमान याबद्दल सांगितले. त्यांचे समाधान झालेले दिसले.

साडेदहा वाजता त्यांच्याच हाताने ड्राॅ काढला जाईल असे मी जाहीर करून टाकले. 


    कोणातरी एकाला ती घड्याळ मिळाली. स्वत: वॉर्डननी रक्कम मोजून आलेले एकशे बारा रुपये हिरामनच्या स्वाधीन केले.


हिरामनने मारलेली मिठी तो सोडायला तयार नव्हता. आणि मलाही ती सोडवावीशी वाटत नव्हती…..


                © सुरेश इंगोले.

Thursday 8 October 2020

जीवनात बरेच प्रसंग येतात. बरे-वाईट सगळेच प्रसंग काही ना काही शिकवून मात्र जातात. सचोटीने जगण्याचे संस्कार बालपणापासूनच मिळाले. पण अन्याय, खोटेपणा, लबाडी या गोष्टींविरुद्व लढण्याचे बाळकडू सुद्धा मिळाले होते. आता या वयात गतायुष्याचे सिंहावलोकन करताना खूप घटना आठवतात. कधी मन विषण्ण होतं...कधी सुखावतं…कधी हसू येतं… वाटलं...या गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या तर...तेवढाच विरंगुळा ! **** ***** ***** # होस्टेल_ लाईफ.. नागपूरला होस्टेलमध्ये राहत असताना माझे सहकारी सगळेच वयाने मोठे होते. कारण मी पंधराव्या वर्षीच हायर मॅट्रीक झालो होतो. माझ्यापुढे सगळेच थोराड दिसत. मला रॅगिंग करण्याचा प्रयत्न मी प्रत्येक वेळी हाणून पाडला होता. आम्ही आर्वीहून आठजण तेथे शिकायला आलो होतो. आमच्या ग्रुपमध्ये दांडगे मुलं होते. मी त्यांच्यामध्ये बारका असूनही कदाचित अभ्यासू व पुस्तकी किडा म्हणून माझा वरचष्मा होता. कुणाला नमवायचे, कुणाची खोड जिरवायची, कुणावर कुरघोडी करायची याचे नियोजन माझ्याकडे असायचे… बिंझाणी होस्टेलमध्ये एसबीसिटी कॉलेज व मोहता सायन्स कॉलेज चे विद्यार्थी होते. फायनलच्या एका सीनिअर विद्यार्थ्याशी आमच्यातील एकाचा उगाच वाद झाला. 'अपनी औकात में रहना' अशी धमकी देऊन तो गेला. त्याला औकात दाखवायची जबाबदारी माझ्यावर आली. रहस्यकथा, बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक हे माझे तत्कालीन गुरू… दोन दिवस अभ्यासपूर्वक फूलप्रूफ प्लान तयार झाला. रिहर्सल न करता टायमिंगची अचूक प्रॅक्टिस केली गेली. आणि…. प्लान अमलात आणण्याची वेळ आली. आमच्या होस्टेलची मेस मिश्रा चालवीत होते. त्यांचे आचारी, वाढपे सगळे बिहारी होते. हॉलमध्ये भिंतीलगत डेस्क बेंच वर आम्ही बसायचो. वाढपी मध्ये फिरत वाढत असायचे. त्यातला भाजी वाढणारा खूप त्रास द्यायचा. म्हणजे एका टोकापासून भाजी वाढायला सुरुवात केली की ती अर्ध्यातच संपायची. तो पुन्हा आतून भाजी घेऊन आला की परत त्याच टोकापासून सुरुवात करायचा. आम्ही दुसऱ्या टोकाला असल्यामुळे आमच्यापर्यंत तो येतच नसे. त्यांची मिश्राकडे कितीदा तक्रार केली पण काही फायदा होत नव्हता.जेवताना ताटात भाजी पडायला उशीर झाला तर काय अवस्था होते याचा अनुभव सर्वांनीच घेतला असेलच…. आज रात्री एका दगडात किती पक्षी मरतात ते पाहायचे होते. तो सीनिअर विद्यार्थी जेवायला येताच आम्ही काही जण त्याच वेळी जेवायला बसलो. आपापल्या जागा ठरताच आम्ही नेत्रपल्लवीने योजनेचे स्वरूप ठरवून घेतले. योजना अशी होती की भाजी वाढणारा दुसऱ्या फेरीत येताच दारात उभ्या मुलाला इशारा केला जाईल. तो खोलीतल्या मुलाला संकेत देईल. खोलीतला मुलगा बल्ब काढून त्यात नाणे टाकून बटन दाबताच होस्टेलचा फ्यूज उडेल. त्या क्षणिक अंधारात भाजीची गरम वाटी वाढप्याला फेकून मारली जाईल. क्षणातच शेजारच्या ताटातील वाटी आपल्या ताटात पटापट घेतली जाईल. योजनेप्रमाणे नेत्रपल्लवी झाली. क्षणात अंधार झाला. मी शेजाऱ्याच्या ताटातील बटाट्याच्या गरम भाजीची वाटी त्याला अंधारात फेकून मारली. एक किंकाळी हॉलमध्ये घुमली. थोड्या धावपळीनंतर मेणबत्त्या लावल्या गेल्या.ज्याच्या अंगावर भाजी सांडली तो थयथया नाचत होता. मिश्रा भाजीची वाटी कोणी फेकली म्हणून ओरडत होता. आम्ही जणू काही माहिती नाही असे निवांतपणे जेवत होतो. तेवढ्या वेळात फ्यूज टाकला गेला आणि वीज आली. हॉलमध्ये वॉर्डनसुद्धा आले होते. ' किस की थाली में कटोरी नहीं है?' मिश्राजी ओरडले. आणि त्याचवेळी तो सीनिअर विद्यार्थी भांबावून जोरात बोलला, " माझ्या ताटातील वाटी कोणी घेतली.?" सगळ्यांचे लक्ष त्याच्या ताटाकडे गेले. मी वाटी फेकून मारली नाही असे त्याने सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण वॉर्डन व मिश्रा यांच्या तावडीतून तो सुटू शकला नाही. या सगळ्या प्रकरणात आमचा काही सहभाग असेल याची साधी शंकाही कोणाला आली नाही. किंबहुना आम्ही ती येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. © सुरेश इंगोले

            


         जीवनात बरेच प्रसंग येतात. बरे-वाईट सगळेच प्रसंग काही ना काही शिकवून मात्र जातात. 


      सचोटीने जगण्याचे संस्कार बालपणापासूनच मिळाले. पण अन्याय, खोटेपणा, लबाडी या गोष्टींविरुद्व लढण्याचे बाळकडू सुद्धा मिळाले होते. आता या वयात गतायुष्याचे सिंहावलोकन करताना खूप घटना आठवतात. कधी मन विषण्ण होतं...कधी सुखावतं…कधी हसू येतं…


      वाटलं...या गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या तर...तेवढाच विरंगुळा !


          ****      *****     *****

    # होस्टेल_ लाईफ..



    नागपूरला होस्टेलमध्ये राहत असताना माझे सहकारी सगळेच वयाने मोठे होते. कारण मी पंधराव्या वर्षीच हायर मॅट्रीक झालो होतो. माझ्यापुढे सगळेच थोराड दिसत. मला रॅगिंग करण्याचा प्रयत्न मी प्रत्येक वेळी हाणून पाडला होता. आम्ही आर्वीहून आठजण तेथे शिकायला आलो होतो. आमच्या ग्रुपमध्ये दांडगे मुलं होते. मी त्यांच्यामध्ये बारका असूनही कदाचित अभ्यासू व पुस्तकी किडा म्हणून माझा वरचष्मा होता. कुणाला नमवायचे, कुणाची खोड जिरवायची, कुणावर कुरघोडी करायची याचे नियोजन माझ्याकडे असायचे…


   बिंझाणी होस्टेलमध्ये एसबीसिटी कॉलेज व मोहता सायन्स कॉलेज चे विद्यार्थी होते. फायनलच्या एका सीनिअर विद्यार्थ्याशी आमच्यातील एकाचा उगाच वाद झाला. 'अपनी औकात में रहना' अशी धमकी देऊन तो गेला. त्याला औकात दाखवायची जबाबदारी माझ्यावर आली.

रहस्यकथा, बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक हे माझे तत्कालीन गुरू…


    दोन दिवस अभ्यासपूर्वक फूलप्रूफ प्लान तयार झाला. रिहर्सल न करता टायमिंगची अचूक प्रॅक्टिस केली गेली. आणि….


    प्लान अमलात आणण्याची वेळ आली.


आमच्या होस्टेलची मेस मिश्रा चालवीत होते. त्यांचे आचारी, वाढपे सगळे बिहारी होते. हॉलमध्ये भिंतीलगत डेस्क बेंच वर आम्ही बसायचो. वाढपी मध्ये फिरत वाढत असायचे. त्यातला भाजी वाढणारा खूप त्रास द्यायचा. म्हणजे एका टोकापासून भाजी वाढायला सुरुवात केली की ती अर्ध्यातच संपायची. तो पुन्हा आतून भाजी घेऊन आला की परत त्याच टोकापासून सुरुवात करायचा. आम्ही दुसऱ्या टोकाला असल्यामुळे आमच्यापर्यंत तो येतच नसे. त्यांची मिश्राकडे कितीदा तक्रार केली पण काही फायदा होत नव्हता.जेवताना ताटात भाजी पडायला उशीर झाला तर काय अवस्था होते याचा अनुभव सर्वांनीच घेतला असेलच….


   आज रात्री एका दगडात किती पक्षी मरतात ते पाहायचे होते. तो सीनिअर विद्यार्थी जेवायला येताच आम्ही काही जण त्याच वेळी जेवायला बसलो. आपापल्या जागा ठरताच आम्ही नेत्रपल्लवीने योजनेचे स्वरूप ठरवून घेतले. 


     योजना अशी होती की भाजी वाढणारा दुसऱ्या फेरीत येताच दारात उभ्या मुलाला इशारा केला जाईल. तो खोलीतल्या मुलाला संकेत देईल. खोलीतला मुलगा बल्ब काढून त्यात नाणे टाकून बटन दाबताच होस्टेलचा फ्यूज उडेल. त्या क्षणिक अंधारात भाजीची गरम वाटी वाढप्याला फेकून मारली जाईल. क्षणातच शेजारच्या ताटातील वाटी आपल्या ताटात पटापट घेतली जाईल.


 योजनेप्रमाणे नेत्रपल्लवी झाली. क्षणात अंधार झाला. मी शेजाऱ्याच्या ताटातील बटाट्याच्या गरम भाजीची वाटी त्याला अंधारात फेकून मारली. एक किंकाळी हॉलमध्ये घुमली. थोड्या धावपळीनंतर मेणबत्त्या लावल्या गेल्या.ज्याच्या अंगावर भाजी सांडली तो थयथया नाचत होता. मिश्रा भाजीची वाटी कोणी फेकली म्हणून ओरडत होता. आम्ही जणू काही माहिती नाही असे निवांतपणे जेवत होतो. तेवढ्या वेळात फ्यूज टाकला गेला आणि वीज आली. हॉलमध्ये वॉर्डनसुद्धा आले होते. 

' किस की थाली में कटोरी नहीं है?' मिश्राजी ओरडले. 

आणि त्याचवेळी तो सीनिअर विद्यार्थी भांबावून जोरात बोलला, " माझ्या ताटातील वाटी कोणी घेतली.?" 


सगळ्यांचे लक्ष त्याच्या ताटाकडे गेले. मी वाटी फेकून मारली नाही असे त्याने सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण वॉर्डन व मिश्रा यांच्या तावडीतून तो सुटू शकला नाही.


      या सगळ्या प्रकरणात आमचा काही सहभाग असेल याची साधी शंकाही कोणाला आली नाही. किंबहुना आम्ही ती येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली.


                    © सुरेश इंगोल

Monday 28 September 2020

रखमाचं गाणं

 #रखमाचं_गाणं


सकाळी फिरायला जायला सुरुवात केली आणि नवनवीन गोष्टी कळू लागल्या.


माझ्या घरासमोर सरकारी दवाखान्याला लागून काही चंद्रमौळी झोपड्या आहेत. पहिल्याच झोपडीत रखमा राहते. नवरा, मुलगी व मुलगा असा छोटासा संसार. प्रपंचाला हातभार लावायला छोटेसे दुकान चालवते. एवढ्या अडचणी सोसूनही आनंदी राहणारी.


         परवा सकाळी फिरायला निघालो तोच तिच्या झोपडीतून गाण्याचा आवाज ऐकू आला. गाण्याची चाल ओळखीची वाटली म्हणून थबकलो. आणि गाणं ऐकून चकितच झालो.

ती तल्लीन होऊन गात होती.


       " तुमी जवय आले

            काहून हासून राह्यले

                  तुमी असे कसे मले

                            सपनं दाखौले


           आता माह्यवालं मन

                   ना झोपते ना जागते

             काय करू बापा मले

                    कसंच्या कसं लागते....


            काय करू बापा मले...कसंच्या कसं लागते..।


मी तिला आवाज दिला. "रखमे !"

" काय जी काकाजी ?" ती लगबगीने बाहेर आली.

" किसना घरी नाही का ?"

" न्हाई जी ! टरक घिवून गेले.." 

" म्हणूनच.कसंच्या कसं लागते वाटते..? "मी असं म्हणताच ती ' काय काकाजी तुमी बी...!' म्हणत लाजून घरात पळाली.


        मी हसत हसत ' कुछ कुछ होता है ' गुणगुणत चालू लागलो.


                                    ©सुरेश इंगोले.

Thursday 3 September 2020

एकलव्य



                   एकलव्य

   

          अंगणात ठेवलेली नवीन सायकल पाहून मी सौ.ला विचारले," कुणाची आहे गं सायकल?"


ती म्हणाली," तो नाही का…. दोन महिन्यांपूर्वी तुम्हाला विचारून सायकल ठेवून दवाखान्यात गेला होता."


      मला आठवले. एक साधारण पन्नाशीचा सडपातळ, विरळ अर्धवट पिकलेले केस, बारीक मिशी, पॅंट आणि टी शर्ट घातलेला हसतमुख इसम सरळ फाटक उघडून आत आला होता. चेहरा ओळखीचा वाटला होता. तो हसून परवानगी मागत म्हणाला," नवीन सायकल आहे गुरुजी. मुलानं घेऊन दिली. पण माझ्याने तिचा लॉक तुटला. दवाखान्यात जाऊन येईपर्यंत ठेवू का? तिथं चोरी जायची भिती वाटते."

 मी हसून परवानगी दिली. 

नंतर त्याने केव्हा सायकल नेली ते कळले नाही.


आज पुन्हा एकदा तो सायकल ठेवून दवाखान्यात गेला होता. मी पोर्चमध्ये झोपाळ्यावर बसून पेपर वाचू लागलो. 


   फाटक वाजले तशी मान वर करून मी पाहिले. फाटक उघडून तो आत आला होता. मी त्याला बोलावले. त्याने आढेवेढे घेतले पण मी खुर्चीकडे इशारा करताच तो पायऱ्या चढून आला व खुर्चीवर बसला.


     त्याने तोंडावरचा मास्क काढताच मला हा चेहरा ओळखीचा वाटला होता पण नाव गाव काही आठवत नव्हते.


  " मला ओळखलं नाही का गुरुजी?" त्याने विचारले.


"आठवत नाही बुवा.." मी कबूल केले.


" मी ज्ञानेश्वर शेंडे. ठाणा पेट्रोल पंप ला राहतो. मूळ गाव निहारवाणी. साधारण पंचवीस वर्षे झाली असतील, मी माझ्या बहिणीला तुमच्याकडे शिकवणीला घेऊन यायचो. आणि शिकवणी होईपर्यंत बाहेर बसून राहायचो."


अजूनही मला काही केल्या आठवत नव्हते. तोच पुढे म्हणाला," गुरुजी, एकदा मला मोठा साप निघाला होता. मी मारला होता त्याला."


आता मात्र मला आठवले. साप दिसताच त्याला अडवीत काठीसाठी त्याने आरडाओरडा केला होता. शेजारी व घरमालक जमले पण साप पाहून पळाले होते. काठी मिळताच त्याने एकट्याने त्याला मारले होते.


" तुमच्या बहिणीचे नाव काय?" मी विचारले.

 

" तिचे नाव सारिका... सारिका शेंडे..तुमची आवडती विद्यार्थिनी.."


त्याने नाव सांगताच तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. पंधरा सोळा वर्षांची, हुशार, चुणचुणीत मुलगी.किंचित सावळा वर्ण, पाणीदार डोळे, चेहऱ्यावर तेज. ती जात्याच हुशार होती. वर्गात कोणत्याही विषयावरील प्रश्र्नांची उत्तरे ती पटापट द्यायची. मी तिची चौकशी केली तेव्हा कळले की घरची परिस्थिती बेताची असल्याने तिचे एकटीचे शिक्षण सुरू होते. आई-वडील दोघेही अशिक्षित होते. एक मोठा भाऊ होता त्याला आठवीतून काढून मजुरीला लावले होते. बारावीनंतर हिचेही लग्न करून द्यायचे ठरले होते. मला तिच्याबद्दल अनुकंपा वाटत होती. मी तिच्या वडिलांना भेटीला घरी बोलावले तेव्हा हाच भाऊ त्यांना घेऊन संध्याकाळी घरी आला होता. 


त्यांची समजूत काढणे फार कठीण होते. पण माझे विचार कळल्यावर त्याने आश्वासन दिले, " गुरुजी, सारिकाला खूप शिकू द्या. मी डब्बल मजुरी करीन पण तिला शिकवीन..बाबांची समजूत काढतो मी."

 

" तिला रोज संध्याकाळी घरी शिकवणीला आणत जा. मी एकही पैसा घेणार नाही. " तेव्हापासून तो रोज तिला सायकलवरून घरी आणायचा. आणि शिकवणी होईपर्यंत बाहेर बसून राहायचा.


   " सारिका कुठे आहे हल्ली? काय करते ती ?" मी विचारले.


  त्याचा चेहरा अभिमानाने भरून आला. " ती तहसीलदार आहे गुरुजी परभणी जिल्ह्यातील एका शहरात. तिचे मिस्टर डॉक्टर आहेत. दोन मुलं आहेत त्यांना. तिची मुलगी खूपच हुशार आहे आणि मुलगाही चुणचुणीत आहे. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ती तुम्हाला भेटायला आली होती गुरुजी. मीच घेऊन आलो होतो. पण तुम्ही मुंबईला गेले होते आणि महिनाभर येणार नाही असे कळले. तुम्ही दाखवलेल्या मार्गानेच गेली ती. आणि जिद्दीने एमपीएससी झाली. "


माझा ऊर अभिमानाने भरून आला. माझ्या डोळ्यात तरळलेले पाणी पाहून तोही सद्गदित झाला. 


    तेवढ्यात सौ. चहा घेऊन आली. आम्ही दोघेही चहा पिऊ लागलो.


" तुम्ही काय करता सध्या.." चहा संपताच मी प्रश्न केला. 

" सांगतो गुरुजी..पण मला अहो जाहो करू नका. खूप लहान आहे मी तुमच्यापेक्षा." तो अजिजीने म्हणाला. 

मी हसलो.


" मी स्वत:ला तुमचा विद्यार्थीच मानतो गुरुजी."


" ते कसं काय ? तुम्ही आठवीनंतर शाळा सोडली. मी कॉलेजला शिकवीत असल्यामुळे तुम्हाला शिकवल्याचा प्रश्नच येत नाही." मी विचारले.


" मला शिकण्याची खूप इच्छा होती गुरुजी. पण संधी मिळाली नाही. सारिकाच्या शिकवणीच्या निमित्ताने मी बाहेर बसून तुमचा शब्द न् शब्द ऐकायचो. तुम्ही तिला सामान्य ज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र आणि इंग्रजी ग्रामरचे धडे द्यायचे. घरी गेल्यावर तिच्याशी चर्चा करायचो. तुमच्या सांगण्यावरून मी मराठी व इंग्रजी असे दोन्ही वर्तमानपत्र लावले. जागतिक आणि प्रादेशिक घडामोडीवर आम्ही चर्चा करीत असायचो. तिचा एमपीएससी चा पाया घातला गेला. आणि माझ्याही ज्ञानात भर पडू लागली."


" ती बारावीत असताना माझे लग्न झाले. समंजस बायको मिळाली. तुम्ही एकदा म्हटलेले वाक्य माझ्या कायम लक्षात राहीले. सचोटीने पैसा कमावण्यासाठी शिक्षणाची गरज नाही तर धाडस आणि कष्टाची गरज असते. मी हे पक्के लक्षात घेऊन बायकोशी सल्लामसलत केली. मजुरीच्या पैशाने सारिकाचे शिक्षण होऊ शकलेच नसते. ठाण्याच्या बसस्टॉप जवळ आत्याचे घर होते. तिच्या परवानगीने तेथे चहाची टपरी सुरू केली. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रे ठेवू लागलो. मग बायकोच्या मदतीने हळूहळू भजी, समोसे, आलूबोंडे व तर्रीपोहे ठेवणे सुरू केले. पाहता पाहता टपरीचे रुपांतर हॉटेल मध्ये कधी झाले कळलेच नाही."


" सारिका ने पदवीनंतर एमपीएससी चा मार्ग निवडला. तिला मी सगळी पुस्तकं आणून दिली. तिने शिक्षणाचे चीज केले."


" आत्याने ती जागाच मला देऊन टाकली. तिलाही मी काही कमी पडू दिले नाही. आता तेथे दोन मजली इमारत बांधली आहे. खालच्या बाजूला हॉटेल आहे. बाजूच्या भागात आम्ही राहतो. वर दोन मुलांसाठी दोन ब्लॉक काढले. मोठ्याचे लग्न करून दिले. तो हॉटेलचा सर्व व्यवहार पाहतो. धाकट्याने ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याला दोन तीन गाड्या घेऊन दिलेल्या आहेत. माझी सायकल मात्र सुटत नाही. जुनी सायकल मोडीत टाकून धाकट्याने मला ही नवीन सायकल घेऊन दिली."


" सगळं देवदयेने सुरळीत सुरू आहे, गुरुजी. या माझ्या वाटचालीत आजवर मी सचोटी सोडली नाही. आणि ही तुमची शिकवण मानून माझ्या मुलांनाही मी तेच संस्कार दिले."


  " खरं सांगू गुरुजी...प्रत्यक्षात नसले तरी मी तुम्हाला माझा गुरू मानतो. एकलव्याप्रमाणे मी तुमची शिकवण अमलात आणली आणि त्याचे फळ मला मिळाले….."


      बोलता बोलता तो उठला व माझ्या पायाशी वाकू लागला तसे मी त्याला उठवले. घट्ट मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर थोपटत म्हणालो,

" शेंडे, तुम्ही स्वत:ला एकलव्य मानत असलात तरी मी द्रोणाचार्य नव्हे. हे सगळे यश तुमचेच आहे. कोणालाही त्याचे श्रेय देऊ नका. मला खरंच तुमचा अभिमान वाटतो. "


      तो माझे दोन्ही हात हातात घेऊन अजिजीने म्हणाला," गुरुजी...आपले पाय माझ्या घराला लागावे अशी आमची सर्वांची खूप इच्छा आहे. नाही म्हणू नका गुरुजी. कधी येता ?"


 मी हसून म्हणालो, " नक्कीच येईन. नुकतेच गुडघ्यांचे ऑपरेशन झाले. छान चालता फिरता आले की अगदी चालत चालत येईन. मग तर झाले.."


      सायकल घेऊन जाताना पुन्हा त्याने साद घातली, " नक्की या गुरुजी…!" आणि सायकलवर बसून जाऊ लागला. तो दिसेनासा होईपर्यंत मी तिकडे पाहतच राहिलो. खांद्याला स्पर्श होताच मी वळून पाहिले. सौ. माझ्याकडे कौतुकाने पाहत होती.

       तिला विचारले," मग ? कधी जायचे समोसे, तर्रीपोहे खायला ?"


                      © सुरेश इंगोले

sureshingole.blogspot.com